मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्रातील राष्ट्रीय चरक पुरस्कार डॉ. अभय कुलकर्णी यांना प्रदान कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी यांचा सत्कार

लातूर, – भारतीय दंत संघटनेची मुख्य शाखा मुंबई यांच्या वतीने दंत चिकित्सा शास्त्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा “राष्ट्रीय चरक पुरस्कार (शाखा: मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्र)” येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्र विभागातील सहयोगी प्रा. डॉ. अभय कुलकर्णी यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

या यशाबद्द्ल कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते डॉ. अभय कुलकर्णी यांचा शाल व ज्ञानेश्वरांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उप प्राचार्य डॉ. यतिश कुमार जोशी, विभाग प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी माले, डॉ. सायोज्यता बांगर हे उपस्थित होते.

भारतीय दंत संघटनेची मुख्य शाखा मुंबई यांच्या वतीने दंत शाखेतील वेगवेगळ्या विषयात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दंत रोग तज्ज्ञांना राष्ट्रीय चरक पुरस्कार दिला जातो. सन 2024 मधील या पुरस्कारासाठी देशभरातून नामांकन अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्र शाखेत डॉ. अभय कुलकर्णी यांनी केलेली रुग्ण सेवा, संशोधन, विविध पुस्तकांचे लेखन, कॉपी राईट व तंबाखु नियंत्रणासाठी केलेले भरीव कार्य लक्षात घेवून हा पुरस्कार त्यांना जाहिर झाला. मुंबई येथील जिओ कन्वेन्शन सेंटर येथे नुकताच पार पडलेल्या सोहळ्यात भारतीय दंत संघटनेचे अध्यक्ष डॉ. रविंद्रनाथ यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. अभय कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव डॉ. अशोक ढोबळे, प्रभारी डॉ. दिपक माखीजानी हे उपस्थित होते.

डॉ. अभय कुलकर्णी हे गेल्या 12 वर्षापासून दंत शाखेतील मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्र या विषयात कार्यरत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा ‘अविष्कार 23’ हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांची दंत आरोग्य विषयात तीन पुस्तके प्रसिध्द आहेत. दंत आरोग्य जागृतीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड या भाषेत ही पुस्तके प्रकाशीत केली आहेत. त्यांचे राज्यस्तरीय 20, राष्ट्रीय 6, आंतरराष्ट्रीय 3 नियतकालीकात शोधनिबंध प्रसिद्ध असून 8 कॉपीराईट आहेत. नाविन्यपूर्ण उपकरणे व संशोधनासाठी ते नेहमी प्रयत्नशील असून तंबाखु विरोधी मोहिमेसाठी सुध्दा ते सातत्याने कार्यरत आहेत.

या यशाबद्दल डॉ. अभय कुलकर्णी यांचे प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, विविध विभागाचे प्रमुख यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.